“ऑपरेशन सिंदूर” देशातील करोडो महिलांच्या कुंकवाचा सन्मान…..आ. सौ. श्वेताताई महाले पाटील.
या भारत भूमीची कन्या असलेल्या हिमांशी नरवाल ने लग्नाच्या एक आठवड्याच्या आत आपल्या नेव्ही ऑफिसर असलेल्या पतीला गमावले, परंतु या देशाचे पालकत्व स्वीकारलेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या भारतभूमीच्या कन्येच्या पुसलेल्या कुंकवाचा बदला ऑपरेशन सिंदूर ने घेतला असे उद्गार आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी माध्यमांशी बोलताना काढले.
22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यात पहेलगाम येथे 26 जणांचा मृत्यू झाला होता, भारताच्या सार्वभौमत्वावर झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण भारतावर शोक कळा पसरली होती. या हल्ल्याला तितकेच ठोस प्रत्युत्तर देण्यात यावे अशीच भावना संपूर्ण देशभरातून व्यक्त केली जात होती. देश भावनेचा आदर करून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी काल रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे बेचिराख करण्यासाठी “ऑपरेशन सिंदूर” जारी केले होते. दहशतवाद्यांचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून ऑपरेशन सिंदूर ने चोख कामगिरी केल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही भगिनीचे कुंकू पुसणाऱ्या कोणत्याही दहशतवाद्याला आता त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, अशीच भारताची प्रतिमा जगाच्या पटलावर निर्माण होत आहे. असे आमदार श्वेता ताई महाले पाटील म्हणाल्या.


