जनतेच्या प्रश्नांसाठी संवेदनशील हस्तक्षेप,विद्याधर महाले यांच्या निर्देशांनी हलले प्रशासन…
चिखली,खंडाळा,शेलगाव जहागीर,एकलारा,पाटोदा,भोरसा,भोरसी,पेनसावंगी या महत्त्वाच्या मार्गावरील रखडलेल्या डांबरीकरणाच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले आणि आमदार श्वेता महाले पाटील यांनी गंभीर दखल घेतल्याने प्रशासन तातडीने सक्रिय झाले आहे.विद्याधर महाले यांच्या निर्देशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अवघ्या एका दिवसात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणीसाठी दाखल झाले.
दि. ७ जून रोजी विद्याधर महाले यांनी शेलगाव जहागीर, खंडाळा आणि एकलारा परिसराचा दौरा करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक आणि नागरिकांनी शेलगाव–खंडाळा व शेलगाव–पेनसावंगी रस्त्यांच्या रखडलेल्या डांबरीकरणाचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
ग्रामस्थांनी सांगितले की, निधी मंजूर होऊनही गेल्या दोन महिन्यांपासून काम बंद असून ठेकेदाराने डांबर उपलब्ध नसल्याचे कारण देत काम अर्धवट अवस्थेत सोडले आहे. परिणामी शेतकरी, विद्यार्थी, प्रवासी तसेच रुग्णवाहिका सेवेलाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास दळणवळण व्यवस्था गंभीरपणे प्रभावित होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली.
स्थानिक नागरिकांची व्यथा ऐकल्यानंतर विद्याधर महाले यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून रखडलेली कामे त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच शेलगाव–खंडाळा आणि शेलगाव–पेनसावंगी रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
विद्याधर महाले यांच्या निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता भगुरे आणि अभियंता मोहन केंदळे यांनी ८ जून रोजी संबंधित मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून रखडलेले काम त्वरित सुरू करण्याबाबत सूचना दिल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे, या रस्त्यांच्या कामासाठी स्थानिक पातळीवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र काम अर्धवट राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. अशा परिस्थितीत विद्याधर महाले यांनी स्वतः लक्ष घालून प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिल्याने या प्रश्नाला नव्याने गती मिळाली आहे.
अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर आणि काम लवकर सुरू होणार असल्याच्या आश्वासनामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक दिवसांपासून रखडलेला हा महत्त्वाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे…


