राहुल बोन्द्रे यांचे चुकले काय?फरक नितीचा की नियतीचा?.. भाग 3
एकीकडे कागदावरची सूतगिरणी, दुसरीकडे प्रत्यक्ष उत्पादनाचा कारखाना..
चिखली विधानसभा मतदारसंघात उभारण्यात आलेल्या दोन सहकारी सूतगिरण्या आज विकासाच्या दोन टोकांची उदाहरणे ठरत आहेत. माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी उभारलेली मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणी आणि आमदार श्वेता महाले यांनी उभारलेली बालाजी सहकारी सूतगिरणी या दोन्हींची तुलना केली असता, नियत, कार्यक्षमता आणि विकासदृष्टी यातील फरक ठळकपणे समोर येतो.
राहुल बोंद्रे यांनी मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीसाठी २५,००० चात्यांची क्षमता दाखवून ५ टक्के भागधारकांचे भांडवल, ४५ टक्के शासन अनुदान आणि ५० टक्के शासन कर्ज अशा स्वरूपात तब्बल ९५ टक्के निधी शासनाकडून उचलला अशी माहिती आहे,मात्र प्रत्यक्षात केवळ १३,००० चाते असलेलीच सूतगिरणीची इमारत उभारण्यात आली. उर्वरित निधीचा नेमका उपयोग कुठे झाला, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
याउलट आमदार श्वेता महाले यांनी २०२५ मध्ये बालाजी सहकारी सूतगिरणी पूर्ण २५,००० चाते क्षमतेने सुरू करून दाखवली. केवळ उद्घाटनापुरती मर्यादित न राहता, ही सूतगिरणी प्रत्यक्ष उत्पादन, रोजगार आणि आर्थिक गती देणारी ठरली आहे.
उत्पादनाच्या बाबतीतही फरक स्पष्ट आहे.मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीत दिवसाला अवघे ४ टन उत्पादन होत असल्याची माहिती आहे, तर बालाजी सहकारी सूतगिरणीत दिवसाला तब्बल १२ टन उत्पादन घेतले जात आहे. म्हणजेच क्षमता, नियोजन आणि व्यवस्थापनातील तफावत आकड्यांतूनच बोलकी ठरते.
अजून गंभीर बाब म्हणजे मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीवर जप्तीचा आदेश येऊन गेलेला आहे. शासनाची ४५ टक्के सबसिडी आणि शासनाकडून घेतलेले ५० टक्के कर्ज म्हणजेच सामान्य भारतीय जनतेचा जवळजवळ सुमारे ५५ कोटी रुपयांचा पैसा या प्रकल्पात गुंतवला गेला होता. या निधीतून अनेक तरुणांना रोजगार देता आला असता, मतदारसंघाचा आर्थिक चेहरामोहरा बदलता आला असता.
मात्र प्रत्यक्षात गरीब शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून घेतलेले शासकीय कर्ज डुबले, आणि सूतगिरणी बंद अवस्थेत पोहोचली. त्यामुळे एकच प्रश्न निर्माण होतो ही सूतगिरणी मतदारसंघाच्या विकासासाठी होती की केवळ काहींच्या घराच्या विकासासाठी?
या पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले यांचे काम अधिक ठळकपणे समोर येते. पूर्ण क्षमतेची सूतगिरणी, अधिक उत्पादन, अधिक रोजगार आणि चालू उद्योग ही केवळ घोषणा नव्हे तर प्रत्यक्षात उतरवलेली विकासाची दिशा आहे.
आज चिखलीत प्रश्न इतकाच नाही की कोणी सूतगिरणी उभारली? खरा प्रश्न आहे कोणासाठी उभारली? आणि कोणाच्या फायद्यासाठी चालवली?… बाकी जनता सुज्ञ आहेच…


