खोट्या आरोपांची फॅक्टरी आणी पुराव्यांची अॅलर्जी : राहुल बोन्द्रे.. भाग 2
दयासागरजी महाले सांस्कृतिक सभागृहावरून राहुल बोंद्रेंचा ‘रेटून खोटे बोल’ महोत्सव…
चिखली शहराच्या सांस्कृतिक इतिहासात मैलाचा दगड ठरेल असे स्वर्गीय दयासागरजी महाले सांस्कृतिक सभागृह अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. अत्याधुनिक सुविधा, भव्य रंगमंच, उत्कृष्ट ध्वनी-प्रकाश व्यवस्था आणि पुणे-मुंबईतील नामांकित रंगमंचांनाही लाजवेल असे स्वरूप असलेले हे सभागृह चिखलीच्या वैभवात भर घालणारे ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे व सर्वात सुंदर सांस्कृतिक केंद्र म्हणून या सभागृहाकडे पाहिले जात आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची संकल्पना मांडून तो प्रत्यक्षात पूर्णत्वास नेण्याचे श्रेय आमदार श्वेता महाले यांना मिळणार, हे स्पष्ट होत असतानाच माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी नेहमीप्रमाणे आरोपांचे राजकारण सुरू केले,कोणताही ठोस पुरावा नसताना सभागृहाच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप त्यांनी केले.
राहुल बोंद्रे स्वतः नगरपरिषद अध्यक्ष राहिले, तब्बल दहा वर्ष आमदार राहिले. मात्र त्यांच्या कार्यकाळात चिखली शहराचा विकास हा नगरपरिषद व जिल्हा परिषद शाळांची अवस्था, स्वच्छतेचा अभाव, शैक्षणिक परिसरांमधील दुर्गंधी हे सगळे त्यांच्या कार्यकाळातील “विकास मॉडेल” होते. स्वतःच्या घरामागील शाळेपासून ते शहरातील इतर शाळांपर्यंत, घाण, दुर्गंधी आणि दुर्लक्ष यांचे साम्राज्य होते. पण त्या काळात हे सगळे ‘सामान्य’ होते; आज मात्र विकास दिसू लागला की भ्रष्टाचाराचा डंका वाजवला जातो.
स्व.दयासागरजी महाले सांस्कृतिक सभागृहाच्या बाबतीतही तेच झाले.आमदार श्वेता महाले यांनी संकल्पना मांडली, पाठपुरावा केला, निधी आणला आणि सभागृह प्रत्यक्षात उभे राहू लागले. शहराच्या विकासाचे क्रेडिट आता निश्चितपणे त्यांना मिळणार, हे स्पष्ट होताच राहुल बोंद्रेंच्या राजकीय रडारवर “भ्रष्टाचार” हा शब्द चमकू लागला.
विशेष म्हणजे, आरोपांची ही तोफ डागल्यानंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी अत्यंत साधी, सरळ आणि कायदेशीर मागणी केली—“पुरावे द्या.” आणि इथेच हा सारा तमाशा उघडा पडला.
भ्रष्टाचार नसताना पुरावे कुठून येणार?आणि पुरावेच नसताना पुढे बोलायचे तरी काय?
आज चिखलीकरांच्या लक्षात येऊ लागले आहे की “भ्रष्टाचार” हा शब्द राहुल बोंद्रेंसाठी विकासावर प्रश्नचिन्ह उभे करण्याचे हत्यार आहे, सत्य शोधण्याचे साधन नाही. आरोप करायचे, गोंधळ घालायचा, वातावरण विषारी करायचे आणि नंतर गुपचूप बाजूला व्हायचे—हीच त्यांची राजकीय कार्यपद्धती बनली आहे.पुराव्यांशिवाय रेटून खोटे बोलणाऱ्यांवर विश्वास ठेवायचा तरी किती?


