जिल्हा बँकेचे सीईओ अशोक खरात ‘गॉड गिफ्टेड’ की फक्त ‘गिफ्टेड’?
नुकतेच जिल्हा सहकारी बँकेचे सीईओ श्री अशोक खरात यांना 2028 पर्यंत रिझर्व बँक ऑफ इंडियाने मुदतवाढ दिली.या जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले श्री अशोक खरात यांचा या जिल्ह्याची जिल्हा सहकारी बँक,अन्नदाता शेतकरी आणि सामान्य सभासद यांना नेमका काय फायदा झाला? हा संशोधनाचा विषय आहे.
जिल्हा सहकारी बँकेचे सीईओ असलेले श्री अशोक खरात यांचे राहणीमान एखाद्या कार्पोरेट कंपनीच्या सीईओ प्रमाणे जरी असले तरी काम व प्रत्यक्ष कृती करण्याच्या बाबतीत काय? कोणताही कॉर्पोरेट सीईओ आपली कंपनी किंवा आपली संस्था सर्वोत्तम कशी राहील यासाठी विरोधक आणि प्रसंगी शासन यांच्याशी झगडून आपल्या संस्थेचे हित जोपासत असतो. आपल्या भागधारकांचे हित त्याच्यासाठी सर्वोच्च असते. याबाबतीत श्री अशोक खरात कुठे येतात?
अनेक वर्षापासून जिल्हा सहकारी बँकेची धुरा सांभाळत असलेले सीईओ अशोक खरात यांचा या बँकेची स्थापना ज्या मूळ सामान्य शेतकरी व सभासदांसाठी झाली होती त्या शेतकऱ्याला काय फायदा झाला?
जिल्हा बँकेचे कर्ज घेऊन, गिळून बसलेल्या राजकीय लोकांना हात लावण्याची हिंमत सीईओ अशोक खरात कधी दाखवणार? सर्वच प्रकरणे न्यायालयाकडे न्यायची तर सीईओ चे काम काय? आपल्या जातीतील,आपला माणूस मोठ्या पदावर विराजमान आहे हे भूषण नक्कीच आहे पण तो माणूस जर काही कामाचाच नसेल तर त्याच्या मोठेपणाचा समाजाला, शेतकऱ्याला काय फायदा? श्री अशोक खरात हे सामान्य शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा सहकारी बँकेचे सीईओ आहेत की राजकारणातील ‘साहेब’ व जिल्ह्याच्या राजकारणात व प्रशासनात प्रभाव असलेले प्रशासकीय अधिकारी ‘साहेब’ यांचे सी. ई. ओ. आहेत?
श्री अशोक खरात यांच्या पदकालावधी वाढी निमित्त शेकडो लोकांनी त्यांचे स्टेटस लावलेले होते त्यामध्ये एका स्टेटसला ” A God gifted man” असा त्यांचा उल्लेख केलेला होता. परंतु त्यांची ‘गोगलगाय कार्यपद्धती’ पाहून “Is he God gifted or only Gifted?” असा प्रश्न निर्माण होत आहे… उदाहरण द्यायचे झाल्यास अनुराधा साखर कारखाना आणि राहुल बोंद्रे यांच्याशी संबंधित सूतगिरणी व इतर प्रकरणांमध्ये राहुल बोंद्रे यांच्यावर जवळजवळ शंभर कोटींची थकबाकी यांच्याच कार्यकाळात दाखवण्यात आली होती. थकबाकी आहे पण ती वसुल कोण करणार? वसूल करण्यासाठी सीईओ अशोक खरात यांनी नेमकं केलंय काय? हे प्रश्न अनुत्तीरित आहेत. अशा वेळेस सीईओ अशोक खरात हे चिखलीतील ‘भाऊ’ आणि ‘साहेब’ या दोन्ही तबल्यावर हात ठेवून संतुलन साधून आहेत का? की बोंद्रे यांचा सत्ताधारी पक्षात प्रवेश होण्याची शक्यता असल्याने त्यांच्याकडच्या थकबाकी वर बोलायला साहेबांनी त्यांना मनाई केली?अशा अनेक बाबी आहेत…
ही कोणतीही टीका नसून एका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला, जिल्हा बँकेच्या एका साधारण सभासदाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे त्यांना कळावे म्हणून मुद्दाम उंचावून दाखवलेला आरसा आहे! हे खरात साहेबांना कळेल त्यावेळेस त्यांच्या कर्माचा आम्हा बुलढाणा वासियांना फायदा मिळेल ही या दीपावलीला ईश्वर चरणी प्रार्थना आहे.


